कोल्हापूर माझा दि.७ : मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या संकल्पनेतून घडला निरोपाचा शाही समारंभआयुष्यभर शासनाची नोकरी करताना दिलेलं योगदान, केलेला त्याग, आणि सर्वसामान्यांची केलेली कामे असे अधिकारी व कर्मचारी जेव्हा सेवेतून नियत वयोमानानुसार निवृत्त होतात, तेव्हा त्यांना निरोप देताना आजवर केलेल्या कामाची पोहोच पावती म्हणून त्याचा निरोप समारंभ अविस्मरणीय ठरला पाहिजे, या भूमिकेतून मुद्रांक विभागाचे जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे साहेब यांनी घडवून आणलेला सदिच्छा समारंभ म्हणजे एक संबंधितांना मिळालेले एक नोबल प्राइजच म्हणावे लागेल.
वाघमोडे साहेब म्हणजे एक कल्पक, संवेदनशील अधिकारी, एक रत्नपारखी, अत्यंत अभ्यासू, सकारात्मक विचार करणारे व नागरिकांच्या प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य देणारे एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची मुद्रांक विभागात ख्याती आहे. आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातत्यानं मार्गदर्शन करून ,प्रेरणा देणारे ,त्यांच्यातील कलागुणांना वेळोवेळी संधी देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचे बीज पेरणारे वाघमोडे साहेबांची सकारात्मकता दिसून येते. आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवून, त्यांना समजून घेऊन प्रशासनात आनंदी वातावरण ठेवत काम केले की विभाग जोमाने काम करून नावलौकिक मिळवतो ही भावना वाघमोडे साहेब यांनी उराशी बाळगली.
कोल्हापूरमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या वेळी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड असावा, अशी कल्पना मांडली सर्व स्टाफ ने साहेबांची कल्पना स्वीकारली. जो ड्रेस कोड निवडण्यात आला तो पाहिल्यानंतर डोळ्याचे पारणे फिटावे असाच आहे. अशाच पेहराव्यामध्ये उपस्थित राहिलेला स्टाफमुळे या कार्यक्रमाची उंची आणखीन वाढत होती. वाघमोडे साहेब यांनी केलेले नेटके नियोजन व या कार्यक्रमांमध्ये प्रत्येकाला सहभागी होण्याची दिलेली संधी यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. मुद्रांक अधीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे चे अशोक पाटील,मुद्रांक उपनियंत्रक पुणे विभाग पुणे चे दीपक सोनवणे व सह जिल्हा निबंधक धनंजय जोशी यांचा प्रदीर्घ सेवेनंतर सपत्नीक केलेला सत्कार पाहून उपस्थित लोक भारावून गेलीत. अशोक पाटील सरांचा सत्कार सोहळा त्यांच्या नाबाद १०० वर्षाच्या मातोश्री डोळे भरून मनात साठवत होत्या. क्षणाक्षणाला त्यांच्या डोळ्यातून येणारे आनंदाश्रू पदराने पुसत त्यांचा उर समाधानाने व अभिमानाने भरून येत होता.
अशोक पाटील यांच्या भगिनी ने भावाबद्दल केलेल्या कौतुकाने केवळ अशोक पाटीलच नव्हे तर व्यासपीठावरील सर्व मंडळी व उपस्थित जनसमुदाय गहिवरला. नात्यातील असलेला घट्टपणा, बहिण भावाने जपलेलं नातं, हेच या मनोगतातून अधोरेखित होत होते. राधाने आपल्या मनोगतात बाबा सेवा कालावधीत जास्त वेळ मला देऊ शकले नाहीत. ही खंत व्यक्त करत आता निवृत्तीनंतर थोडा वेळ देतील असे सांगत असताना, ती फारच भावूक झाली.याबाबतीत मी हट्ट करणार नाही असे सांगितले .बाबा जसे माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, तसे इतरांसाठीही ते मित्र म्हणून फार महत्त्वाचे आहेत. माझ्या बाबांनी आयुष्य मध्ये पैशापेक्षा लोक खूप मिळवले आहेत. लोकसंपत्तीमध्ये माझे बाबा जगात श्रीमंत आहेत. त्यामुळे इतरांसाठीही माझे बाबा तितकेच महत्त्वाचे आहेत . त्यामुळे त्यांनाही वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे मी बाबांना समजावून घेइन , असे राधाने सांगितल्यानंतर संपूर्ण सभागृह निस्तब्ध झाले. क्षणभर कोणालाच काही कळेना, अशी स्थिती झाली. हा सर्व प्रसंग पाहून वाघमोडे साहेब सुद्धा नि:शब्द होऊन गेले. सोनवणे साहेब, जोशी साहेब यांच्या अर्धांगिनी, नातेवाईक यांनी केलेल्या मनोगतातून सुद्धा सभागृहातलं वातावरण निस्तब्ध झालं
अशोक पाटील यांनी आपली अर्धांगिनी लता हिच्या त्याग, समर्पण, मला समजून घेत केलेला संसार व माझ्या गायन कला वादन यासाठी तिने दिलेली मोकळीक व मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही घेतलेली काळजी त्यामुळे आपण प्रशासनात हसतकर काम करू शकलो. यावर त्यांची अर्धांगिनी लता पाटील आपले मनोगत व्यक्त करताना माझ्या पतीने मिळवलेली माणसे हीच माझ्यासाठी सुद्धा लाख मोलाची आहे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा काही खूप अभिमान व गर्व आहे त्यांच्या अंगी असलेला साधेपणा, सहकार्याची वृत्ती, त्यांच्या अंगी असलेली संवेदनशीलता यामुळे ते लोकप्रियतेच्या सर्वोच्च स्थानी पोहचले,,,.असे सांगताच पुन्हा भावनिक वातावरण निर्माण झाले. इतकी भावनिकतेची किनार या कार्यक्रमाला लाभली होती.
मनोगतातून सर्व मान्यवरांचा होणारा सन्मान पाहून व्यासपीठावर बसलेल्या सत्कारमूर्तींचा चेहरा समाधानाने व सात्विक आनंद देणारा असा दिसत होता. सर्वांच्या मनोगतातून या सर्व सत्कारमूर्तींनी आजवर केलेल्या कार्यक्रमाची पोहोचपावती होती. ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये अशोक पाटील साहेबांनी आपल्या अधिकार पदाची झुल बाजूला सारून आपल्यातील माणूसपण दाखवत त्यांनी आयुष्यात अनेकांचे सोने केले. अशी सर्व माणसे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आवर्जून उपस्थित होतीत . इतरांसाठी केलेली मदत ही या हाताची त्या हाताला कळू नये ही भूमिका अशोक पाटील सरांनी अंतिम क्षणापर्यंत जपली. वाघमोडे साहेब यांनी घडवून आणलेला हा शाही कार्यक्रम त्या दोघांच्या मैत्रीची साक्ष देत होता. याच कार्यक्रमात निवृत्त झालेल्या अन्य कर्मचाऱ्यांचा ही सन्मान तितक्याच सन्मानाने केला. सेवानिवृत्तीनंतर अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान या पुढील काळात असाच दिमाखात व्हावा, अशी सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केली.
वाघमोडे साहेबांनी सुरू केलेली शाही निरोप समारंभाची त्यांनी मुक्त कंठाने स्तुती केली. उपस्थितांसाठी कार्यक्रमाच्या अगोदर शाहीर आझाद नायकवडी यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. शाहीर आझाद नायकवडी यांनी शाहू महाराज यांच्यावर पोवाडा सादर केला आणि उपस्थितांनी त्यास टाळ्यांच्या कडकडाट प्रतिसाद दिला. तर मुख्य कार्यक्रमात सर्व सत्कारमूर्तींच्या कार्यकर्तृत्वावर खास करून अशोक पाटलांच्या संपूर्ण आयुष्यातील वाटचालीवर सादर केलेल्या पोवाड्याने या कार्यक्रमात अनोखा रंग भरला. पोवाडा ऐकताना अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. गोड आवाजातील निवेदन व कार्यक्रमाच्या शेवटी सादर केलेला पसायदान ने मनीषा नाईकवडी यांनी या कार्यक्रमाची महती वाढवली.
एखाद्या सर्वोच्च पदावर असताना देखील वाघमोडे साहेबांच्या अंगी असलेला साधेपणा, मितभाषीपणा, संवेदनशीलता, त्यांच्या अंगी असलेला संयम, सकारात्मक दृष्टी व विचार, कार्यक्रमाच्या नियोजनातील बारकावे, सहकार्याची वृत्ती व कृती,मनाचा मोठेपणा व नेहमी हसमुख चेहऱ्याने सर्वांशी आदबीने बोलणारा एक अधिकारी असू शकतो, हे याच देही याच डोळा अनुभवता आले. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या वाघमोडे साहेबांना माझा मनापासून सलाम…. l !▪️प्रकाश सुतार,सर 9921244694