◾गारगोटी प्रतिनिधी दि.२५ : गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाची जिमखाना निवडणुक ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन घेतलेल्या निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण होण्यास मदत झाली. जनरल सेक्रेटरीपदी शुभम दत्तात्रय गुरव तर विद्यार्थिनी प्रतिनिधीपदी कु.संचिता नामदेव चव्हाण हे बहुमताने विजयी झाले.

यंदा प्रथमच विद्यार्थ्यांच्या जिमखाना निवडणुकीसाठी ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन) चा वापर करण्यात आला. ज्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक व विश्वासार्ह बनली. निवडणुकीसाठी विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक वर्गातून प्रतिनिधींची उमेदवारी घेण्यात आली होती. जनरल सेक्रेटरी, विद्यार्थिनी प्रतिनिधी, वर्ग प्रतिनिधी या पदांसाठी उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज माघार घेणे, उमेदवारांना प्रचार करण्याची संधी, मतदानावेळी मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष आदी निवडणूक यंत्रणा उभा करुन प्रत्यक्ष मतदानावेळी बोटाला शाई लावण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपले मतदान स्वखुशीने व शिस्तबद्ध पद्धतीने नोंदवले. ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाची मोजणी काही मिनिटांतच पूर्ण झाली आणि निकाल तात्काळ जाहीर करण्यात आले. निवडून आलेल्या जिमखाना प्रतिनिधींमध्ये जनरल सेक्रेटरी, विद्यार्थिनी प्रतिनिधी, वर्ग प्रतिनिधी आदींचा समावेश आहे.
जिमखाना निवडणुक प्रक्रिया प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर डी.जी.लकमले, जी डी. ठाकूर, बी. ए. डावरे, आर. पी. गव्हाणकर, पी.पी.भंडारी, एस.एम.साळवी, युवराज शिगावकर, श्रीमती आर.आर.बहादुरे, बी. के. इंगळे, राजेश गिलबिले, सौ. एल.आर.पाळेकर, सौ. सुजाता पाटील, ऋषिकेश गव्हाणकर, धीरज मेंगाणे, श्रावणी देसाई आदी शिक्षकांच्या देखरेखीखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.