गारगोटी प्रतिनिधी दि.१६ : महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी लहान मोठे उद्योग सुरु करुन उद्योजक बनावे, असे उदगार तरुण उद्योजिका सौ.केतकी ठाकूर यांनी काढले. गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व्यवसाय क्षेत्रभेटी अंतर्गत केतकीज फूड इंडस्ट्रिजला भेट दिली. यावेळी तरुण उद्योजिका सौ.केतकी ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना सौ.केतकी ठाकूर म्हणाल्या, महिलांनी स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी उद्योगाची कास धरणे आवश्यक आहे. केतकीज फूड इंडस्ट्रिज या उद्योगाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. चांगला माल तयार करुन संपूर्ण महाराष्ट्रभर पाठविला जाते. मालाची गुणवत्ता चांगली असेल तर मागणी निश्चित वाढते. हाच धागा पकडून दर्जेदार, गुणवत्तापूर्ण मालाची निर्मिती करण्यावर भर दिला आहे. विविध प्रकारचं पापड बनविण्यात येतात त्यामध्ये नाचणी, पोहा उडीद, तांदूळ, पालक पापड तसेच लोणचे, हळद, हिंग बनविली जातात.
यावेळी कु.श्रेया खोत, कु.अथर्व सावंत, कु.राजनंदिनी शिंदे, कु.राजरत्न कांबळे, कु.वेदांत जाधव, कु.वैभवी भेंडवडेकर या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मिलिंद पांगिरेकर, श्री. युवराज शिगावकर, श्री. बी. ए. डावरे यांचे मार्गदर्शन लाभले.