कोल्हापूर माझा दि.१९ : सरकारने पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची करुन दाखवावी. आम्ही फक्त दुकानंच नाही तर शाळाही बंद करु, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे यांची विराट सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यावर महायुती सरकारवर जोरदार प्रहार केला.
राज्य सरकारने म्हणे पहिलीपासून हिंदी शिकलीच पाहिजे. त्या निर्णयापासून हे सगळं सुरू झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल म्हणाले, तिसरी हिंदी भाषा सक्तीची करणार म्हणजे करणार. आता राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी करावी. नुसता त्या दिवशी मोर्चाच्या धसक्याने निर्णय मागे घ्यावा लागला, फडणवीसजी, तुम्ही म्हणताय ना तिसरी भाषा हिंदी आणणार म्हणजे आणणार, तर मी आता सांगतो, पहिली ते पाचवी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून तर बघा, दुकानं नाही शाळा सुद्धा बंद करेल. मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतो. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय. इतर अमराठी शाळा आहे तिथे मराठी आणण्याचं सोडून तुम्ही हिंदीसक्ती आणण्याचा दबाव टाकत आहात, तो सहन केला जाणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
हिंदी भाषेला 200 वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय, वर्ष झालंय पण एक रुपया दिलेला नाही. हिंदी भाषेमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील नट-नट्यांचं भलं झालं, अन्य कुणाचं भलं झालं ते मला सांगा ? हिंदी भाषेमुळे कुणाचं भलं झालं आहे? त्यासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय? अशी टीका राज यांनी केली. हिंदी भाषेनं 250 भाषा मारुन टाकल्या. बिहारमध्ये त्यांनी हिंदी भाषा स्वीकारली. तिथं आजही 99 टक्के लोकं मातृभाषा बोलतात.भाषा कोणतीही वाईट नसते. हिंदीही वाईट भाषा नव्हे, आमच्यावर लादणार असाल तर नाही बोलणार जा, असंही राज यांनी यावेळी सांगितलं. आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे. पण हिंदुत्वाच्या बुरख्यातून तुम्ही हिंदी लादणार असाल तर माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार नाही.
पालघरसह मीरा रोडपर्यंतचा संपूर्ण पट्टा हिंदी भाषिक करण्याचा त्यांचा डाव आहे. त्यामाध्यमातून हा संपूर्ण पट्टा गुजरातला जोडण्याचा त्यांचा कट आहे, असा आरोप राज यांनी केला. आम्ही गुलाम नाही. या प्रांतावर आमचा अधिकार आहे. मराठे अटकेपार पोहोचले होते, हा इतिहास आहे. तो महाराष्ट्र हतबल आहे का? बाकीचे माणसं बाहेरुन आले ती तुमच्यासमोर रुबाब करणार. स्वत:हून काही करण्याची गरज नाही. पण, असा कुणी माज घेऊन आला तर त्याला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच तुमची सत्ता लोकसभेत आणि विधानभवनात आहे. आमची सत्ता रस्त्यावर आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.











Users Today : 20
Total Users : 12794
Views Today : 63
Total views : 17177