▪️कागल ( मारुती कांबळे ) दि.१५ : सोनगे येथील मजूर युवक राहुल कांबळे याने सावकाराच्या धमक्या आणि मानसिक छळामुळे विष प्राशन करून आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेबद्दल रिपब्लिकन पक्ष (आठवले) तर्फे तीव्र निषेध मुरगुड पोलीस ठाणे येथे नोंदविण्यात आला असून, या प्रकरणातील दोषींवर भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाचे कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखरजी कोरे यांनी केली आहे.
चंद्रशेखर कोरे यांनी सांगितले की, ” राहुल कांबळे हा ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून प्रामाणिकपणे मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याला वारंवार धमक्या देऊन मानसिक त्रास दिला गेला. अखेरीस त्या दडपशाहीला कंटाळून त्याने औषध प्राशन करून आपले आयुष्य संपवले. मृत्यूपूर्वी त्याने व्हिडिओद्वारे स्वतःच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल न झाल्यास रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडेल.”पुढे बोलताना कोरे म्हणाले की, “लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या जिल्ह्यात मजूर, मागासवर्गीय समाजातील तरुणांना अशा प्रकारच्या सावकारी आणि दडपशाहीचा सामना करावा लागतो ही गोष्ट अत्यंत दुःखद व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा वाईट प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे.”
दूरध्वनीवर सोनगे प्रकरणाबाबत चंद्रशेखर कोरे यांची जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) यांच्याशी चर्चा : सोनगे येथील युवक राहुल कांबळेच्या मृत्यूप्रकरणी रिपब्लिकन पक्षाचे कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखर कोरे यांनी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे (दादा) यांच्याशी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली.या संभाषणात कोरे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती देत घटनेतील गंभीर बाबी आणि स्थानिक परिस्थितीबाबत सविस्तरपणे सांगितले. जिल्हाध्यक्ष कांबळे (दादा) यांनी घटनेची गंभीर दखल घेत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी आर कांबळे, विठ्ठल कांबळे नंदयाळकर,शिवाजी कांबळे ,मोहन कांबळे ,शशिकांत कांबळे, यांच्या सह रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व सोनगे गावातील गावकरी बंधू उपस्थित होते.











Users Today : 20
Total Users : 12794
Views Today : 63
Total views : 17177