Homeशैक्षणिकपदवीधर व शिक्षक मतदार याद्यांमध्ये नाव नोंदविण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार...

पदवीधर व शिक्षक मतदार याद्यांमध्ये नाव नोंदविण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे आवाहन

पुणे, दि. ३०: पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित नव्याने मतदार याद्या (डी – नोव्हो) तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदार नोंदणीची सुरुवात झाली आहे. अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

पदवीधर व शिक्षक मतदार याद्यांमध्ये नव्याने नाव नोंदणी करण्यासंदर्भात जाहीर झालेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी विधानभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.डॉ.पुलकुंडवार म्हणाले, २०२० मधील मतदार नाव नोंदणी असली तरी पदवीधर व शिक्षकांना पुन्हा नव्याने नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

पदवीधर नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक १८ व शिक्षक नाव नोंदणीसाठी नमुना क्रमांक १९ भरुन देणे आवश्यक आहे. याकरिता भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या यादीतील विद्यापीठातून १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान ३ वर्षापूर्वी पदवीधर झालेला किंवा पदवीशी समकक्ष शैक्षणिक पात्रता धारण करणारे पदवीधर पात्र राहतील. सर्व कार्यालय प्रमुखांना त्यांच्या कार्यालयातील पदवीधर कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील पदवीधर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी. शिक्षक मतदार नोंदणीसाठी २०१९ ते २०२५ या कालावधीत किमान ३ वर्षे शिक्षक पदावर कार्यरत असलेला, माध्यमिक व त्यावरील दर्जाच्या मान्यताप्राप्त शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक नाव नोंदणीसाठी पात्र राहील.

शैक्षणिक संस्थांचे प्रमुख (मुख्याध्यापक/प्राचार्य) एकत्रितरित्या सर्व शिक्षकांचे नोंदणी अर्ज संबंधित तहसील कार्यालयात जमा करू शकतात. शैक्षणिक संस्थांनी नमुना क्रमांक २ मधील शिफारशीसह अर्ज सादर करावेत असेही ते म्हणाले.कोणत्याही राजकीय पक्षामार्फत, पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी, नागरीक कल्याण संघटना आदींकडून एक गठ्ठा पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तथापि, एकाच कुटुंबातील एकत्र राहणाऱ्या कुटुबियांचे अर्ज कुटुंबातील कोणतीही व्यक्ती एकत्रित सादर करू शकते, असेही त्यांनी सांगितले.मतदार नोंदणी प्रक्रियेसाठी ऑनलाइन प्रणाली तयार करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे प्रयत्न सुरू आहेत. प्रणाली सुरू झाल्यानंतर त्याची माहिती प्रसिद्धीमाध्यमातून जाहीर करण्यात येईल.

या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी अशी पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली अशा पाच जिल्ह्यात मिळून ६३ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. त्याशिवाय ५८४ पद निर्देशित अधिकारी आणि १२२ अतिरिक्त पद निर्देशित अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, असेही डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर सूचना ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली असून त्यानुसार मतदार नोंदणीची सुरुवात झाली आहे. वर्तमानपत्रातील जाहीर सूचना प्रथम पुनर्प्रसिद्धी- बुधवार १५ ऑक्टोबर, द्वितीय पुनर्प्रसिद्धी- शनिवार २५ ऑक्टोबर, नमुना क्रमांक १८ किंवा १९ द्वारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक-गुरूवार ६ नोव्हेंबर, हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई- गुरुवार २० नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी- मंगळवार २५ नोव्हेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे- गुरुवार २५ डिसेंबर व मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी- मंगळवार ३० डिसेंबर २०२५

RELATED ARTICLES

Most Popular